शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर लासलगावात कांदा लिलाव ४ दिवसांनी सुरू


लासलगाव : आज शुक्रवारी सकाळी चार दिवसांनी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव पुर्ववत सुरू झाले. फक्त 50 वाहनातील 600 क्विंटल उन्हाळ कांदा सकाळी विक्रीस आला असुन कोणताही बदल कांदा भावात न होत पाच दिवसापूर्वी लिलावात जाहीर झालेला सर्वाधिक कांदा भाव 5900 रूपये जाहीर झाला. तर लाल कांदा आवक अजिबात झालेली नाही. 1500 ते 5900 रूपये व सरासरी 5100 रूपये सकाळी भाव जाहिर झाला.
30 ऑक्टोबर पासुन लिलाव पुर्ववत सुरू झाले असल्याची माहीती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रिती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली. सकाळी 09.00 ते 12.00 व दुपारी 03.30 ते लिलावाचे कामकाज संपेपर्यंत लिलाव पूर्ववत चालू राहतील. तसेच सकाळी 08.00 वाजता कांदा खरेदीचे लिलाव सुरू होतील. असे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. विंचुर येथे 1500 ते 6351 व सरासरी रूपये 5300 रूपये भाव मिळाला आहे.

कांद्याचे लिलाव सलग चार दिवसांपासून जिल्ह्यातील लासलगावसह प्रमुख 15 कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये बंद होते. कांद्याचे लिलाव बंद असल्यामुळे चार दिवसांत 100 ते 120 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. कांदा अगर शेतीमाल विक्रीकरीता दिवाळीच्या खरेदीकरीता हा कालावधी महत्वाचा असतो. व्यापाऱ्यांनी कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांनी असमर्थता दर्शविली होती.

यासंदर्भात राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी काल बैठक घेतल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेऊन मंत्रालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत बैठक केली. कांदा साठवणुकीवर आलेले निर्बंधांच्या बाबत केद्र सरकारसमोर मुख्यमंत्री आपले मांडणार आहेत. त्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्याने गेली चार दिवस सुरू असलेली कांदा लिलाव बंदची कोंडी सुटली आहे.