मराठा समाजाचा 7 नोव्हेंबरला ‘पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा’


पंढरपूर: सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलाच आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. पंढरपूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून आयोजित पत्रकार परिषदेत या मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. या मोर्चाला पंढरपूरमधून 7 नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. सर्व आंदोलक 20 दिवसांचा पायी प्रवास करत मंत्रालयावर धडक देणार आहेत.

हा आक्रोश मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून देण्यात आली आहे. सरकारला हा मोर्चा महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

यापूर्वी तुळजापूरमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सरकारला त्यावेळी 15 दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले होते. त्याला 21 दिवस उलटून गेले तरीही सरकारकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्यामुळे 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. हा मोर्चा एकूण २० दिवस असणार आहे. रोज 20 ते 25 किलोमीटर अंतर पार करण्यात येईल. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे सदस्य सहभागी होणार आहे.

पंढरपूर ते मंत्रालय हा आक्रोश मोर्चा अकलूज, नातेपुते, बारामती, पुणे मार्गे मुंबई असा जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.