शालेय शिक्षण मंत्र्यांची माहिती; दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार


मुंबई: दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच 11वी प्रवेश प्रक्रियेबाबत बैठक घेणार आहे. विद्यार्थी हिताचा निर्णय त्या बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा 9वी ते 12वीचे विद्यार्थी हे जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत विचार केला जाईल, असे गायकवाड यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बिकट बनली आहे. टप्प्या-टप्प्यात फी भरण्याची मुभाही अशा पालकांना देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. त्याचबरोबर जर विद्यार्थी फी भरु शकला नाही तर शाळा अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून एखाद्या शाळा प्रशासनाने वंचित ठेवल्यास, अशा शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

तर 11वी प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने रखडल्यामुळे कनिष्ठ महाविद्यालये सुरु होण्यास वेळ लागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच बैठक घेणार आहेत. विद्यार्थी हिताचा निर्णय या बैठकीत घेण्यात येईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबाबत आदेश काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांमध्ये त्यानुसार यापुढे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून 50 टक्के उपस्थिती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. ऑनलाईन, ऑफलाईन, दूरस्थ शिक्षण पद्धतीसाठी हे निर्देश लागू असणार आहेत.