कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण


मुंबई – कोरोनाच्या विळख्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री अडकले आहेत. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे उद्या दिलीप वळसे पाटील यांचा वाढदिवसही आहे. दरम्यान राज्यातील सुमारे १५ ते १६ मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात आता दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश झाला आहे.

यासंदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत सांगितले की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी.