शिवसेना-मनसेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूने मागितली महाराष्ट्राची माफी


मुंबई – बिग बॉसचे सध्या १४ वे पर्व सुरू असून या पर्वात स्पर्धकांमध्ये होत असलेले नवनवे वाद रोज पाहायला मिळत आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या घरात राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान जान कुमार सानू याने राहुल वैद्यला बोलताना मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले.

दरम्यान, हा भाग प्रदर्शित झाल्यानंतर जान कुमार सानूला मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धमकीवजा इशारा दिला होता. तसेच २४ तासांत जान सानूने महाराष्ट्राची माफी न मागितल्यास बिग बॉसचे चित्रिकरण होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर जान सानूने बुधवारी रात्री आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली.

सोशल मीडियात जान कुमार सानूचे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्या वक्तव्याबाबत अनेकांनी संतापही व्यक्त केला होचा. माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते, असे जान कुमार सानू म्हणाला होता. मनसेच्या अमेय खोपकर यांनी त्याच्या या वक्तव्यानंतर कठोर शब्दात इशारा दिला होता. जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला, असे अमेय खोपकर म्हणाले होते.

त्याचबरोबर मुंबईत राहून तर आता तुझे करिअर कसे बनते जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केले नाही ते बरे झाले, गद्दारांची तोंडे कशी असतात ते समजले, असे म्हणत जान सानू याला खोपकर यांनी धमकीवजा इशारा दिला होता.

दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समजही देण्यात आली. तसेच सर्वांच्या भावनांचा आदर या ठिकाणी केला जात असून जान सानूने केलेली चूक पुन्हा होऊ नये असेही बिग बॉसकडून सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वी मी नकळत एक चूक केल्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सर्वांची मी माफी मागतो. माझा मराठी भाषिकांना दुखावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे जान सानू म्हणाला.