‘गो कोरोनाचा’ प्रसिध्द नारा देणारे रामदास आठवलेंना कोरोनाची लागण!


मुंबई – आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यात सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही केलं आहे. नव्यानेच कोरोनाची साथ आली होती त्यावेळी गो कोरोना कोरोना गो अशी घोषणा दिल्यामुळे रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांनी या घोषणा त्यावेळी मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी दिल्या होत्या. आता कोरोनाने रामदास आठवलेंना गाठले आहे. ते खबरदारीचा उपाय म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

रामदास आठवले यांच्यात कोरोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ते वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. त्याचबरोबर रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.