नासाने केला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा


मुंबई : नासाने पत्रकार परिषदेत चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी सापडल्याचा दावा केला आहे. आम्ही ते नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे पहिल्यांदाच शोधले असल्याचे नासाने म्हटले आहे. ही माहिती नासाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.

नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेने चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागांतही पाणी असल्याचा शोध लावला आहे. चंद्रावर पाणी सापडणे महत्त्वाचे असल्याचेही नासाने म्हटले आहे. पाण्याचे अस्तित्व चंद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते मर्यादीत नसून, या शोधातून चंद्राच्या सूर्यप्रकाशीत पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याची माहिती समोर येत आहे.


आपल्या या नव्या शोधाबाबतची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था ‘नासा’ ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याचबरोबर दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय नासाने घेतला आहे. जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल आणि त्या दृष्टीने हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नासाने सांगितले आहे.

भारतीय चंद्रयान-1 ने चंद्रावर पाणी असल्याचा पुरावा हा सर्वात पहिल्यांदा दिला आहे. नासाने चंद्राच्या पृष्ठभागावर किती पाणी आहे याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, जेवढे पाण्याचे अंश सहारा वाळवंटात असतील त्यापेक्षा 100 पटीने कमी पाण्याचे अंश चंद्रावर असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पाण्याचा अंश सापडणे ही शास्त्रज्ञांसाठी आशयकारक गोष्ट आहे.