पंकजा मुंडे यांच्यासह खासदार भागवत कराड, महादेव जानकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल


अमळनेर – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, राज्यसभा खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकरांसह पन्नास जणांविरोधात अंमळनेर(ता.पाटोदा) पोलीस ठाण्यात जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे दसरा मेळावा घेऊन गर्दी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

रविवार दि. 25 ऑक्टोंबर रोजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट(ता.पाटोदा) येथे संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा झाला. कोरोना महामारीमुळे अनेक वर्षांची परंपरा असलेला मेळावा ऑनलाईन झाला. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. पण जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे यावेळी उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

जिल्हा विशेष शाखेचे कर्मचारी किसन सानप यांच्या तक्रारीवरुन रविवारी रात्री उशिरा माजी मंत्री पंकजा मुंडे, राज्यसभा खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मेघना बोर्डीकर, आ.मोनिका राजळे, माजी आमदार भीमराव धोंडे, सविता गोल्हार, पाटोदा पंचायत समिती सभापती सुवर्णा लांबरुड, सरपंच राजेंद्र सानप, राजाभाऊ मुंडे व इतर पन्नास जणांविरुध्द कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.