संशोधकांचा दावा; पुरुषांच्या शरीरात तयार होतात जास्त अँटीबॉडीज


नवी दिल्ली : संपूर्ण जग अद्यापही कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. त्यातच जगभरातील अनेक देशांमध्ये या जीवघेण्या व्हायरसवर विविध संशोधने केली जात आहेत. पोर्तुगालमध्ये असेच एक संशोधन करण्यात आले आहे. सरासरी पुरूष, महिलांच्या तुलनेत कोरोना व्हायरस अँटीबॉडीज जास्त तयार करू शकतात, असा दावा पोर्तुगालमधील संशोधकांनी केला आहे, त्याचबरोबर संशोधकांचे म्हणणे आहे की, 90 टक्के रुग्णांमध्ये सार्स-कोव-2 व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर 7 महिन्यांनी अँटीबॉडी आढळून आल्या आहेत. युरोपीय जर्नल ऑफ इम्युनोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षांनुसार, वयाशी अँटीबॉडीच्या स्तराचा कोणताही संबंध नाही. परंतु, रोगाचे गांभीर्य खूप महत्त्वाचे आहे.

पोर्तुगालमध्ये मेडिसिना मॉलिक्यूलर आण्विक जोआओ लोब एंट्यून्स पासून मार्क वल्डोवेननुसार, मानवी रोगप्रतिकारक शक्ती सार्स-कोव-2 ला हानिकारक व्हायरसच्या स्वरूपात ओळखतो आणि त्यानंतर याचे उत्तर म्हणून अँटीबॉडीचे उत्पादनही करतो. जे व्हायरसशी लढण्यासाठी फायदेशीर ठरते. दरम्यान, संशोधकांनी कोविड-19 रुग्णालयातील 300 हून अधिक रुग्ण आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे अँटीबॉडी स्तर आणि 200 हून अधिक कोरोनामुक्त स्वयंसेवकांची निरीक्षणे नोंदवली होती.

मागील 6 महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर 3 आठवड्यातच अँटीबॉडीच्या स्तरात वेगाने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. पण त्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यामध्ये कमतरता झाल्याचेही दिसून आले. संशोधकांनी सांगितले की, कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात जास्त अँटीबॉडी तयार होतात. परंतु महिला, पुरुष दोघांच्याही शरीरात काही महिन्यांनी अँटीबॉडी स्तर समान पातळीवर दिसून येतो.