सत्ताधारी शिवसेना आमदारांकडूनच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली, गुन्हा दाखल


हिंगोली : कोरोनामुळे दसऱ्याच्या दिवशी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंचा पालखी सोहळा रद्द होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ऐनवेळी शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी पालखी काढली. हजारो भाविक पालखीमध्ये दाखल झाले होते. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दसऱ्याच्या दिवशी परंपरागत पद्धतीने सीमोल्लंघन सोहळा पार पडत असतो. तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभुंना या दिवशी पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथाची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. या पालखीमध्ये दरवर्षी मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री, पंचक्रोशीतील भक्तांची उपस्थिती असते मंदिरातून निघालेली पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सोने लुटण्यासाठी ही पालखी सीमोल्लंघन करून शमीच्या झाडाची सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते.

कोरोनामुळे यावर्षी पालखीचा हा सोहळा रद्द होईल, असे वाटले होते. पण ऐनवेळी शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी ही पालखी काढली. हजारो भाविक पालखीमध्ये दाखल झाले होते. मात्र सत्ताधारी आमदारांकडूनच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने हिंगोली जिल्ह्यात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. संतोष बांगर यांनी यापूर्वीही औंढा नागनाथ मंदिरात सपत्नीक नागनाथाची पूजा केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर चाळीस जणांविरोधात पालखी काढल्याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंढा नागनाथ पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.