आता अगदी सहजपणे बदलता येणार फाटलेल्या नोटा; रिझर्व्ह बँकेकडून गाईडलाईन्स जारी


नवी दिल्ली : जर फाटलेल्या नोटा तुमच्याकडे असतील आणि त्या नोटा दुकानदारही तुमच्याकडून घेत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण या फाटलेल्या नोटा आता अगदी सहजपणे बदलता येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून फाटलेल्या-जुन्या नोटांबाबत मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आल्या असून त्यानुसार, या नोटा ग्राहक आता बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतात.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शकतत्वांनुसार, जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून प्रत्येक बँकेला स्वीकाराव्या लागतील. यात केवळ एकच अट आहे, या नोटा नकली नसाव्यात. बँकेच्या शाखेमध्ये जाऊन फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी कोणताही शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर नोटा बदलण्यासाठी त्या बँकेचे तो ग्राहक असणेही आवश्यक नाही.

नोट बदलून द्यायची की नाही, हे बँकेकडून ठरवले जाते. ग्राहक त्यासाठी बँकेला जबरदस्ती करू शकत नाही. बँकेत नोट दिल्यानंतर, बँक नोट मुद्दाम, जाणून-बुजून फाडलेली नाही ना? हे चेक करते. त्याशिवाय नोटची कंडिशन कशी आहे, हेदेखील बँक तपासते. त्यानंतरच नोट बदलून दिली जाते. बँकेत बदलण्याऐवजी फाटलेल्या नोटा तुम्ही खात्यातही जमा करु शकता.

काही स्थितीत नोट बदलून दिली जात नाही. भारतीय रिझर्व्ह बँकच्या नियमांनुसार, अतिशय खराबप्रकारे जळलेल्या, तुकडे-तुकडे झालेल्या स्थितीतील नोटा बदलल्या जात नाहीत. अशाप्रकारच्या नोटा आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर ज्या नोटांवर कोणताही संदेश लिहिलेला असेल किंवा राजकीय संदेश असल्यास, त्या नोटांचा वापर केला जाऊ शकत नाही.