बहिष्कार करुनही भारतात एका आठवड्यात विकले गेले शाओमीचे 50 लाख स्मार्टफोन


मुंबई : एकीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने #boycottchina, #boycottchineseproducts चा नारा देत चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे आपल्या देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. त्यातच या फेस्टिव्ह सीजनमध्ये चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने देशभरातील स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.

शाओमीने भारतात मागील एका आठवड्यात 50 लाख स्मार्टफोनची विक्री करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सचे शाओमीच्या या यशात महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमुळे शाओमीला हा विक्रम बनवता आला.

अमेझॉन आणि फ्लिपकार्टसोबत यावेळी Mi.com द्वारे शाओमीच्या मोबाईल्सची मोठी विक्री झाली आहे. देशात तब्बल 17,000 पिनकोड्सवर शाओमीने मोबाईल विक्री केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार दरवर्षीपेक्षा दुप्पट विक्री देशभरातील 15,000 किरकोळ भागीदारांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना एमआय इंडियाचे चीफ बिजनेस हेड रघु रेड्डी म्हणाले की, 50 लाख स्मार्टफोन्सची विक्री करणे ही मोठी कामगिरी असून या आकड्यांमुळे असे स्पष्ट होते की ग्राहकांचा आमच्या प्रोडक्ट्सवर किती विश्वास आहे. भारतात कोणत्याही स्मार्टफोन कंपनीला हे जमलेले नाही. चांगल्या किंमतीत उच्च प्रतीचे प्रोडक्ट ग्राहकांना विकणे हेच आमचे मुख्य उद्दीष्ट आहे.

देशभरात गेल्या महिन्याभरात विक्री झालेल्या चिनी मोबाईलची आकडेवारी पाहता, देशात ‘बॉयकॉट चायनीज’ची नुसती हवा आसल्याचे निदर्शनास येत आहे. सध्याच्या घडीला देशभरात शाओमी, रेडमी, रियलमी, वनप्लस, पोको, विवो आणि ओप्पो या चिनी ब्रॅण्डसच्या मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

त्याचबरोबर चीनची आणखी एक कंपनी असलेल्या रियलमीच्या नुकत्याच लाँच झालेल्या नारजो 20 सीरीज या स्मार्टफोनने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने बुधवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार नारजो 20 सीरीजचे 2.31 लाख मोबाईल विकले गेले आहेत. हा मोबाईल 50 लाख भारतीयांना विकणे हे कंपनीचे उद्दीष्ट आहे. कंपनीने 23 सप्टेंबर रोजी तरुणांना नजरेसमोर ठेवून नारजो 20 सीरीज फोन लाँच केला होता. या सीरीजमध्ये तीन फोन लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि मोठी बॅटरी ही या फोनची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

भारतात चिनी फोनवरील बहिष्काराची हाक सातत्याने दिली जात आहे. त्यातच अजून एका चिनी कंपनीने भारतीय बाजारात धुमाकूळ घातला आहे. पोको एम 2 या मोबाईलच्या विक्रीसाठी कंपनीने 15 सप्टेंबर रोजी पहिल्या सेलचे आयोजन केले होते. या फोनच्या पहिल्याच सेलमध्ये 1.30 लाख पोको एम 2 या मोबाईल्सची विक्री झाली आहे. या फोनचे दोन प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 64 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 10 हजार 999 रुपये तर 128 जीबी इंटर्नल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 12 हजार 499 रुपये एवढी आहे. दरम्यान रेडमीचा नोट 9 (Redmi Note 9) या फोनचीदेखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे हा फोन सध्या आऊट ऑफ स्टॉक आहे.