शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणाऱ्यांना राऊतांचे जोरदार प्रत्युत्तर


मुंबई: यंदा शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण फक्त शिवसेना पक्षप्रमुख नाही तर यावर्षी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडणार असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. दरम्यान, मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत आहात, त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा अशी टीका विरोधकांनी केली आहे. संजय राऊत यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना जनाची आणि मनाची बाळगूनच दसरा मेळावा शिवतीर्थावर नाही तर सभागृहात घेत असल्याचे म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात ५० हजार लाखाचे मेळावे भाजप घेत आहे त्याचे काय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी विचारला आहे.

शिवाजी पार्कवरील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी शिवसैनिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. कोरोना नसता तर शिवतीर्थावर शिवसैनिकांचा महापूर आज दिसला असता, असे संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ठासून सांगितले. मोजक्याच लोकांना यंदाच्या दसरा मेळाव्याला आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये पक्षाचे काही पदाधिकारी आणि मुंबईतील शिवसेनेचे आमदार यांचा समावेश असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका सुरु आहे. राऊत यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप बिहार निवडणूक प्रचारात काय करत आहे? तिथे ५० हजार, लाखाचे मेळावे होत आहेत. भाजपने तिथे जनाची आणि मनाची लाज बाळगावी. तर दूसरीकडे नागपुरातही सरसंघचालकांनी मेळावा घेतला. सरसंघचालक आम्हाला आदर्श आहेत. पण तिथे विरोधक काय म्हणतील?, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला प्रश्न विचारला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात ते उपचारासाठी दाखल झाले आहेत. कोरोनाच्या संकटातून फडणवीस लवकर बाहेर पडावेत यासाठी शिवसेना तुळजाभवानी चरणी प्रार्थना करत असल्याचे राऊत म्हणाले. तसेच सेंट जॉर्ज रुग्णालयाला फोन करुन योग्य त्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. फडणवीस लवकर बरे होऊन बाहेर पडतील यासाठी सरकार काळजी घेत असल्याचेही राऊतांनी आवर्जुन सांगितले.