दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन वादाच्या भोवऱ्यात अडकले नेपाळचे पंतप्रधान


काठमांडू – शनिवारी नेपाळच्या जनतेला नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. पण ते आपल्या शुभेच्छांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. कारण शुभेच्छा देणारे जे कार्ड पोस्ट केले त्यात त्यांनी नेपाळच्या जुन्या नकाशाचा समावेश होता.

नेपाळचे राष्ट्रीय चिन्ह, ओली यांचा फोटो आणि नेपाळचा नकाशा या कार्डवर होता. पण पिठोरागड जिल्ह्यातील कालापानी-लिपुलेख-लिमपियाधुरा हा भाग या नकाशात दाखवलेला नव्हता, नेपाळने भारताच्या या भागावर दावा केला आहे. भारतासोबत असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी नवा नकाशा नेपाळने प्रसिद्ध केला होता. यामध्ये भारताच्या उत्तराखंडच्या या भागाचा समावेश होता. हा नकाशा नेपाळने प्रसिद्ध केल्यानंतर भारत आणि नेपाळमधील संबंध ताणले गेले होते.

ओली यांना त्यांच्या विरोधकांकडून विजयादशमीच्या शुभेच्छांनंतर टीकेला सामोरे जावे लागले. नेपाळच्या सरकारने यावर स्पष्टीकरण दिले की, पंतप्रधान ओली यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या कार्डवर छापलेला नकाशा हा तांत्रिक कारणामुळे चुकीचा छापला गेला. शुभेच्छांचे ग्रीटिंग कार्ड हे छोट्या साईजमध्ये असल्याने त्यामध्ये नवा भाग दाखवला गेला नसल्याचे ओली यांचे सल्लागार सुर्या थापा यांनी सांगितले.

ओली यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार राजन भट्टाराई म्हणाले, कालापाणी भागावरील आपला दावा नेपाळने सोडलेला नाही. पंतप्रधान ओली यांच्या नकाशातील चुकीमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण, सहा आठवड्यांपूर्वी त्यांनी स्वतः शाळेची पुस्तके मागे घ्यायला लावली होती आणि त्यात नव्या नकाशाचा समावेश करण्याचे आदेश दिले होते.