मोदींनी माय-लेकाचे सरकार घालवले, त्याचप्रमाणे आपल्या या बाप-लेकाचे सरकार घालवायचे – नितेश राणे


मुंबई: ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून माय-लेकाचे सरकार हटवले. त्याचप्रमाणे आपल्याला राज्यातून बाप-लेकाचे सरकार हद्दपार करायचे असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेने कोरोनाच्या काळात केवळ मोठमोठी टेंडर मंजूर केली. पण प्रत्यक्षात काहीच घडले नाही. आपण लोकप्रियतेच्याबाबतीत देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री असल्याचा दावा उद्धव ठाकरे करत होते. पण ते कोरोनाच्या काळात घराबाहेर पडले नाहीत. अगदी दाऊदची धमकी आली, तरी ते घरातच बसून राहिले, अशा शब्दांत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली देखील उडविली.

रविवारी बोरिवली येथे भाजप आमदार सुनील राणे यांच्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाजप अध्यक्ष मंगलप्रात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार नितेश राणे, आमदार योगेश सागर आणि भाजपचे अन्य नेते या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. नितेश राणे यांनी यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आदित्य ठाकरे यांना बेबी पेंग्विन संबोधत नितेश यांनी त्यांची खिल्ली उडविली. तसेच मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावरही टीका केली. महापालिकेने कोरोनाच्या काळात केवळ मोठमोठ्या रक्कमेची टेंडर मंजूर करवून घेतल्यानंतर प्रत्यक्षात काहीच न घडल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यासह मुंबईतून बाप-लेकाचे सरकार हद्दपार झाले पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

तर मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेशी युती करणार नाही, असे आमदार योगेश सागर यांनी सांगितले. पूर्वी आम्हाला शिवसेना अत्यंत ताकदवान पक्ष आहे, असे वाटत होते. पण स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यानंतर आम्हीच शिवसेनेपेक्षा शक्तिशाली आहोत, हे आमच्या लक्षात आल्याचे योगेश सागर यांनी सांगितले.

त्याचबरोबर पालिकेच्या कारभारावर बोरीवली मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनीही ताशेरे ओढले. पालिकेच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले जाणे आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रासाठी महानगरपालिकेने किती तरतूद केली, याची माहिती समोर आली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्रासाठी साडेतीन हजार कोटींची तरतूद केली होती. मात्र, हे पैसे खर्च झालेत नाहीत, असा आरोप आमदार सुनील राणे यांनी केला.