राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या खडसेंना मिळू शकते मोठी जबाबदारी


जळगाव: राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी प्रथमच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. खडसे यावेळी वाईट प्रवृत्तींशी लढण्याचा हा दिवस असून अपल्यालाही समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात लढायचे असल्याचे म्हणाले. अद्याप मोठे स्वागत बाकी असल्याचे सांगत त्यांनी एकप्रकारे मोठे पद मिळण्याचे संकेतच दिले आहेत.

खडसे राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल होताच फटाके फोडत फुलांची उधळण करण्यात आली. त्यांचे महिला पदाधिकाऱ्यांनी औंक्षण केले. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची यावेळी गर्दी उसळली होती. काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आज पहिलाच दिवस असल्याने आपण जास्त काही बोलणार नसल्याचे खडसे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. सर्वांनी मिळून संघटना वाढविली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच उत्तर महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकनाथ खडसे यांच्या सोबत माजी आमदार गुरुमुख जगवानी यानीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. जिल्ह्यात काय काय आणि कोणी कोणी आपल्यावर अन्याय केला हे उतरण या आपल्या पुस्तकातून आपण मांडले असून हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती जगवानी यांनी माध्यमांना दिली. एकनाथ खडसे जिथे आपण तिथे, असे सांगत आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आपल्यावर अन्याय झाला, पण कोणाचेही नाव आपण घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मला 2016 मध्ये बिनविरोध निवडून आणण्यासाठी खडसेंनी एवढे कष्ट सोसले असताना आता त्यांच्या कठीण काळात मी त्यांना एकटे कसे सोडणार, असेही ते म्हणाले.