राज्यातील जिम 25 ऑक्टोबरपासून होणार सुरु; पण करावे लागणार नियमांचे काटेकोर पालन


मुंबई – राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत दसऱ्यापासून म्हणजेच, 25 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.

आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ठाकरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी करण्यात यावे. स्टिम बाथ, सौना, शॉवर आणि झुम्बा, योगा असे सामुहिक व्यायाम प्रकार एसओपीतील निर्देशानुसार पूर्णपणे बंद राहतील.

आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. पण युरोप खंडातील उदाहरणांवरून आपल्याला सावधही रहावे लागेल. अनेक निर्बंध आपण शिथील करत आहोत. पण यातून हळू-हळू गाफिलपणा वाढू नये यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे आवश्‍यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिम सुरु करण्यासंदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचना :

  • मार्गदर्शक सूचनांची व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना पूर्णपणे माहिती देणे अपेक्षीत आहे.
  • व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे.
  • प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी करावी.
  • शारिरीक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे.
  • व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे.
  • उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे.
  • दररोज रात्री जिम, व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करणे.