तणावाचे व्यवस्थापन आहारातून

तणाव ही आपल्याला एकविसाव्या शतकाने दिलेली देणगी आहे. आपण सध्या अनेक प्रकारच्या तणावांना तोंड देतच आहोत, परंतु त्याचबरोबरीने तणावाचे व्यवस्थापन कसे करता येईल याचाही विचार करायला लागलो आहोत. त्यासाठी योग, ध्यान धारणा, सकारात्मक विचार, व्यायाम, मसाज, ऍरोमाथेरपी, म्युझिक थेरपी असे तणावावरचे अनेक उपाय आपण शोधून काढलेले आहे आणि त्यावर संशोधन सुद्धा सुरू आहे. परंतु आजवर कोणीही आहाराच्या माध्यमातून तणावाचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला नव्हता. काही संशोधकांनी यादृष्टीने काही प्रयत्न केले आहेत आणि काही विशिष्ट आहार घेतल्यास आपले शरीर तणावाचा सामना करण्यास सक्षम होऊ शकते असे त्यांना दिसून आले आहे. माणूस जेव्हा तणावाखाली येतो तेव्हा त्याला थकवा येतो, त्याला गळून गेल्यासारखे होते आणि तो थकवा घालवण्या साठी तो कॉङ्गी किंवा चहा असे उत्तेजक पेय ताबडतोब प्राशन करतो. अशा उत्तेजक पेयांमुळे तात्पुरती चेतना मिळते, परंतु तणावामुळे शरीराचे होणारे कायमचे नुकसान भरून निघत नाही किंवा पुढे तणावात होऊ पाहणार्‍या नुकसानीची बेगमी सुद्धा होत नाही. अशा उत्तेजक पेयांपेक्षा काही तरी वेगळे अन्न पदार्थ प्राशन केले की, उत्तेजक पेयांपेक्षा वेगळा, कायमचा आणि सकारात्मक परिणाम होतो. कारण शेवटी माणूस तणावाखाली असतो तेव्हा त्याच्या शरीराची काही प्रमाणात झीज होत असते. त्याने शरीरात साठवलेल्या काही पोषण द्रव्यांचा र्‍हास होत असतो. विशेषत: प्रथिने, अ, ब, क ही जीवनसत्वे नष्ट होत असतात.

ज्याच्या शरीरामध्ये काही विशिष्ट प्रथिने आणि ही जीवनसत्वे असतात ते तणावाचा परिणामकारकपणे सामना करू शकतात. परंतु ज्याच्या शरीरामध्ये मुळातच ही द्रव्ये कमी असतात ते लोक तणावाचा तेवढा परिणामकारकपणे सामना करू शकत नाहीत किंवा वेगळ्या शब्दात सांगायचे तर असे म्हणता येईल की, जे लोक अशक्त असतात त्यांना तणाव जास्त सहन होत नाही आणि जे सशक्य असतात त्यांच्याकडे तणाव सहन करण्याची ताकद असते. तणाव सहन करण्याची ताकद आपल्याकडे यावी यासाठी या विशिष्ट संशोधनात लक्ष घातलेल्या लोकांनी काही खाद्य पदार्थ जाणीवपूर्वक सुचवलेले आहेत. त्यांनी विशेषत: केळीवर जास्त जोर दिलेला आहे. केळीमध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. ते प्रथिन शरीरामधल्या काही प्रक्रियांमधून सेरोटोनिनमध्ये परिवर्तित होते आणि हे सेरोटोनिन आपल्याला तणावाच्या काळात दिलासा देते. आपली मन:स्थिती बदलण्यास मदत करते आणि आपल्याला आनंदी बनवते.

तेव्हा केळी खाल्ल्याने वजन वाढते हे खरे, परंतु ज्यांना अजून लठ्ठपणाची समस्या निर्माण झाली नसेल त्यांनी अधूनमधून केळी खाल्ली तर त्यांच्या शरीरावर होणारे तणावाचे परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय सहज उपलब्ध असणारे तणावा वरचे दुसरे महत्वाचे औषध म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबतातील क जीवनसत्व आपल्याला तणावापासून दिलासा मिळवून देते. कॅल्शियम युक्त अन्न पदार्थ सुद्धा यादृष्टीने उपयुक्त असतात. त्यानंतर ग्रीन टी, दूध, संत्री इत्यादींमुळे सुद्धा तणावाचे परिणाम कमी होतात. या आहाराशिवाय तणाव मुक्तीसाठी काही सोपे उपाय सांगितले गेले आहेत. रोज आपण जेव्हा झोपेतून उठतो त्यापेक्षा पंधरा मिनिटे आधी उठावे. थोडे का होईना पायी चालावे. सायकलवर थोडीशी रपेट करावी. रोज सकाळी निदान एका अशा माणसाला भेटावे की, जो तुम्हाला धन्यवाद देईल आणि तुम्हाला प्रसन्न करेल.

एकावेळी एकच काम करावे. अनेक कामे ओढवून घेऊन तणाव वाढवू नये. अधूनमधून विनोदी वाचन करावे आणि मनसोक्तपणे हसावे. दर पंधरा-वीस मिनिटांनी दीर्घ श्‍वास घ्यावा आणि जोरात सोडावा. टीव्हीशिवाय संध्याकाळ व्यतित करण्याची सवय लावून घ्यावी. अधूनमधून कसला तरी खेळ खेळावा. शारीरिक हालचालींना नकार देऊ नये. कोणतीही रागाची प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी १ पासून १००० पर्यंत आकडे म्हणावेत, म्हणजे तणाव वाढणारच नाही. मात्र वरील अन्नपदार्थ आवर्जून खाल्ले तर शरीरामध्ये अशा पोषण द्रव्यांचा साठा होईल, जो तणावामुळे होणारे नुकसान भरून काढेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment