मुंबई उच्च न्यायालयाने सुशांत प्रकरणी रिपब्लिक टीव्हीला फटकारले


मुंबई – मुंबई उच्च न्यायालायने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीला फटकारले आहे. प्रेक्षकांना तपास सुरु असताना कोणाला अटक केली जावी अशी विचारणा करण्यासंबंधी तसेच एखाद्या व्यक्तीच्या हक्कांचे शोध पत्रकारितेच्या नावे उल्लंघन करण्यासंबंधी न्यायालयाकडून रिपब्लिक टीव्हीला फटकारण्यात आले. चॅनेलकडून सुरु करण्यात आलेली हॅशटॅग मोहीम तसेच प्रसारित करण्यात आलेल्या काही बातम्यांचा संदर्भ यावेळी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांनी दिला.

यावेळी चॅनेलकडून चालवण्यात आलेल्या #ArrestRhea या हॅशटॅगचा उल्लेख मुंबई उच्च न्यायालयाने केला. तसेच चॅनेलच्या वकील मालविका त्रिवेदी यांना रिपब्लिक टीव्हीने मृतदेहाचे फोटो का दाखवले? तसंच ही आत्महत्या आहे की हत्या यावरुन अंदाज का बांधण्यात आले? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.

चॅनेल हा आत्महत्या आहे की हत्या यासंबंधी तपास सुरु असताना हत्या असल्याचे सागंत असून हिच तुमची शोध पत्रकारिता आहे का?, असा सवाल उच्च न्यायालयाने यावेळी विचारला. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मीडियाला दूर ठेवावे अशा मागणी करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. याशिवाय काही वाहिन्या मीडिया ट्रायल चालवत असून त्यांना रोखले जावे अशीही मागणी करण्यात आली आहे. त्यावर ही सुनावणी सुरु होती.

यावेळी युक्तिवाद करताना रिपब्लिक टीव्हीने सांगितले की, आम्ही सुशांत प्रकरणी दाखवलेल्या बातम्या, रिपोर्ट यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा होण्यास मदत झाली. पत्रकारितेत लोकांचे मत मांडण्याचा तसेच सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण न्यूज चॅनेलवर काय दाखवले जात आहे याचे कौतुक करणार नाही. जर काहीजणांना त्या बातमीमुळे अस्वस्थ वाटत असेल तर हा लोकशाहीचा सार असल्याचे मालविका त्रिवेदी यांनी यावेळी म्हटले.

प्रेसने आपल्या मर्यादा लक्षात ठेवल्या पाहिजेत असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. तुम्ही तपास यंत्रणा, न्यायालयाच्या भूमिकेत जाऊन निकालही जाहीर करत असाल तर आम्ही येथे कशासाठी आहोत?, अशी विचारणा न्यायालयाने केली. मूलभूत पत्रकारितेच्या निकषांचा आम्ही संदर्भ घेत आहोत, एखाद्या आत्महत्येचे रिपोर्टींग करताना पाळणे गरजेचे होते. खळबळजनक बातम्या नाहीत, सतत पुनरावृत्ती नाही. साक्षीदार सोडा, तुम्ही तर पीडित व्यक्तीलाही सोडले नाही, अशा शब्दांत न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला फटकारले. त्याचबरोबर एका महिलेचे वर्णन तुम्ही असे केले की तिच्या हक्कांचे उल्लंघन झाले असल्याचे आमचे प्राथमिक मत आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.