महाविकास आघाडीचे घोटाळे बाहेर येतील, म्हणून सीबीआयला प्रवेश बंदी : किरीट सोमय्या


मुंबई : ठाकरे सरकार सीबीआयला महाराष्ट्रात प्रवेश नसल्याचे म्हणत आहे. कारण महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केलेल्या घोटाळ्यांची माहिती सीबीआयच्या हातात गेली, तर त्यांची पंचाईत होईल, अशी त्यांना भीती वाटत असल्याचा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्यामुळे सीबीआयला आता महाराष्ट्रात तपास करण्यासाठी येण्याआधी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याच निर्णयावरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली.

सीबीआयची सर्वसाधारण परवानगीचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी मिळून स्वत:च्या गुंडगिरीची काळजी घेण्यासाठी मागे घेतला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. कुणीही सोशल मीडियावर विरोधात बोलले तर हे सरकार त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करते. पत्रकारांनी आवाज उठवला तर त्यांना जेलमध्ये टाकले जात असल्याचा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण परवानगी महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. त्यामुळे यापुढे सीबीआयला कोणत्याही प्रकरणी महाराष्ट्रात तपास करण्यासाठी आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.