महिला क्रिकेटरचे पीचवर वधूवेशात फोटोशूट

फोटो साभार इनएक्झेक्युटिव्ह

क्रिकेट पीचवर वधुवेशातील, हातात चुडा भरून बॉल फटकावत असलेल्या एका महिला क्रिकेटरचे फोटो सध्या खुपच चर्चेत आले आहेत. ही क्रिकेटपटू बांग्लादेशाची संजीदा इस्लाम आहे. तिने तिच्या विवाहाअगोदर हे अनोखे फोटोशूट केले असून तिचे हे फोटो शेअर करण्याचा मोह आयसीसीला सुद्धा आवरता आलेला नाही. तिचे हे फोटो आयसीसीच्या अधिकृत ट्विटर अकौंटवर शेअर केले गेले आहेत.

पिवळ्या साडीत, हातात चुडा भरलेली संजीदा कव्हर ड्राईव्ह आणि पूल शॉट खेळताना दिसत आहे. वास्तविक पुरुष खेळाडूप्रमाणेच महिला क्रिकेटपटू सुद्धा मैदानावर उतरताना टी शर्ट आणि पँट या वेशातच येतात. संजीदा प्रथम श्रेणी क्रिकेटर मोसद्देक याच्यासोबत नुकतीच विवाहबद्ध झाली आहे. त्यापूर्वीचे हे फोटो आहेत.

संजीदाने ऑगस्ट २०१२ मध्ये आयर्लंड विरुद्ध टी २० मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. जून २०१८ मध्ये बांग्ला देशाच्या संघात तिचा समावेश झाला. या टीमने त्यावेळी पहिली महिला आशिया कप स्पर्धा जिंकली होती. गेल्या आठ वर्षाच्या करिअर मध्ये संजीदाने १६ वन दे आणि ५४ टी २० सामने खेळले आहेत.