प्रयत्नांना यश…! पाकिस्तानच्या संसदेत मंजूर झाले कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठीचे विधेयक


नवी दिल्ली – पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठी एक विधेयक पाकिस्तानच्या संसदेत मंजूर करण्यात आले असून यांसदर्भातील वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. हे विधेयक मंजूर झालेल्याने कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचा हा मोठा विजय मानला जात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, या विधेयकाचे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस (समिक्षा आणि पुनर्विचार) अध्यादेश असे नाव आहे. पाकिस्तानच्या संसदेत (नॅशनल असेंब्ली) या विधेयकाला विरोधकांचा मोठा विरोध असतानाही कायदा आणि न्यायसंबंधी स्थायी समितीने चर्चा करुन मंजुरी दिली.

पाकिस्तानचे न्याय आणि कायदा मंत्री फरोग नसीम संबंधीत समितीच्या चर्चेत भाग घेताना म्हणाले, आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे. जर नॅशनल असेंब्लीमध्ये या विधेयकाला मंजुरी मिळाली नसती तर पाकिस्तानला आंतराराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे पालन न करण्याबद्दल प्रतिबंधांचा सामना करावा लागला असता.