खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांची प्रतिक्रिया


अहमदनगर: भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत मार्मिक ट्विट केले आहे. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीच्या टीकाकारांना निसर्गाचा नियम सांगत टोला हाणला आहे.
यासंदर्भात रोहित पवारांनी एक ट्विट केले असून, ते आपल्या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असे म्हणतात. त्याचबरोबर वेलकम एकनाथ खडसे साहेब, असे म्हणत त्यांनी खडसेंचे पक्षात जोरदार स्वागत केले आहे.


रोहित पवारांच्या या ट्विटला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचा संदर्भ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार व नेते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला सोडून गेले. राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता राज्यात पुन्हा येणार नाही असा या साऱ्यांचा कयास होता. राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या.

प्रचारसभांमधून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खुद्द समोर पैलवान नसल्याचे सांगत होते. शरद पवारांचे राजकारण संपल्याचेही त्यांनी म्हटले होते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला त्यावेळी या पक्षांतराबाबत प्रश्न विचारले जात होते. पण राष्ट्रवादी व काँग्रेसनं शरद पवारांच्या झंझावातामुळे राज्यात सन्मानजनक जागा मिळवल्या आणि भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले. त्याचा फायदा घेत शिवसेनेने सत्तावाटपावरून भाजपला कोंडीत पकडले. अखेर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा येऊन राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. शरद पवार यांनी त्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येताच राष्ट्रवादीने पुन्हा बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीमध्ये भाजपचे अनेक लोक येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे. खडसे यांचा प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या ट्विटकडे पाहिले जात आहे.