केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत मिळणार बोनस


नवी दिल्ली – आपल्या 30 लाख कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात तो लगेचच जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

2020-21 मधील बोनस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. 30 लाख गैर-राजपत्रित कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. हा बोनस 3,737 कोटी एवढा असल्याचे जावडेकर म्हणाले. त्यांनी ही घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली. बोनसची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) द्वारे वळती केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा बोनस दसऱ्याच्या आधीच दिला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या 30 लाख 67 हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच जम्मू-काश्मिरमध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेलाही मंजुरी देण्यात आल्यामुळे तिथे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या धर्तीवर निवडणुका होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.