एखाद्या दारुड्या प्रमाणे वागत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी; प्रकाश आंबेडकरांची वादग्रस्त टीका


सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी (दि. २०) सांगवी (ता. अक्कलकोट) यासह परिसरातील पूरग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यात तीन पायांचे सरकार असून त्यामधील एक किंवा दोन पाय कोणत्याही पद्धतीची मदत जाहीर न करण्याबाबत तिसऱ्या पायावर दबाव टाकत आहेत. साखर कारखान्यांना अनुदान त्यांना जाहीर करायचे असल्यामुळे ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत हात आखडता घेतल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

पुढे आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने केंद्राकडून मदत येण्याची वाट न पाहता आपली तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली करावी. सर्वसामान्यांचा कर स्वरूपात जमा झालेल्या पैशावर अधिकार असल्यामुळे त्वरित शेतकरी, आपत्तीमध्ये अडकलेल्या कुटुंबीयांना खावटी अनुदान अंतर्गत तातडीने पाच हजार रुपयांची प्राथमिक मदत द्यावी. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. सत्ता गेल्याची कल्पना नसल्यासारखा त्यांचा कारभार सुरू असल्याची टोला आंबेडकर यांनी लगावला.

याच दरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना एखाद्या दारुड्यासारखे पंतप्रधान मोदी वागत आहेत. देशाला कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या नवरत्नांमधील विमान, रेल्वे, आइल कंपन्या कोरोनाची कारणे पुढे करीत विक्रीला काढली आहेत. दारुड्या जवळचे सगळे संपले की तो घरातील वस्तू विकतो, नंतर घरच विकतो, तशी अवस्था मोदींची झाल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.