अतिवृष्टीग्रस्त भागात शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करू नका; फडणवीस


हिंगोली: राज्यातील बळीराजा अतिवृष्टीमुळे पूर्णपणे कोलमडून गेलेला असताना शेतकऱ्यांना रोज बँकांकडून फोन येत असून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. खायला ज्यांच्याकडे घरात काही नाही ते कर्ज कसे फेडणार? असा सवाल करतानाच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे. त्याचबरोबर अतिवृष्टीग्रस्त भागात कर्ज वसुली करू नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त भागांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस पाहणी करत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. हिंगोलीतील शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला असता बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी केल्या. फडणवीस यांनी त्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही बाब निदर्शनास आणून दिली.

शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकांकडून तगादा लावला जात आहे. शेतकऱ्यांना दिवसातून तीन चार वेळा फोन केला जात आहे. घरी येऊन कर्जासाठी अधिकारीही तगादा लावत असल्यामुळे शेतकरी अक्षरश: रडकुंडीला आला असून अतिवृष्टीग्रस्त भागात सरकारने कर्ज वसुली करू नये. शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावा. सरकारने अतिवृष्टी भागात कर्ज वसुली न करण्याचा पहिला आदेश काढावा. तसेच कर्ज वसुली करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

फक्त येऊन माइकमध्ये राज्यातील सर्व मंत्री बोलत आहेत. पण निर्णय कोण घेणार? शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जात नाही. सरकारला गांभीर्य दिसत नाही. केवळ टिंगल टवाळी सुरू असून डायलॉगबाजीही सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. आम्हाला खर खोट ठरवण्याऐवजी जयंत पाटलांनी शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. बोलघेवडेपणा सोडून थेट कृती करून दाखवावी, असा टोलाही त्यांनी लगावला. येथे शेत रस्त्यावरच आहे. दहा दिवस झाले तरी या शेताचा अजून पंचनामा झालेला नाही. पालकमंत्रीही पाहणी करायला आले नसल्याच्या तक्रारी आहेत. पालकमंत्री आले नसतील तर त्यांनी या भागात यावे, असेही त्यांनी सांगितले.