अॅमेझॉननंतर मनसेने वळवला डिस्ने हॉटस्टारकडे आपला मोर्चा


मुंबई – राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासंदर्भातील मोहिमेनंतर आपला मोर्चा आता डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. मनसेने डिस्ने हॉटस्टार कंपनीला सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी पत्र पाठवले आहे. मनसेच्या कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे हॉटस्टार डिस्नेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करणारे पत्र मनसेने कंपनीला पाठवले आहे. आयपीएलचे समालोचन सध्या हिंदी, इंग्रजी, तेलगु, कानडी आणि बंगाली भाषेमध्ये उपलब्ध असून मराठीचा पर्याय अ‍ॅपमध्ये देण्यात आला नसल्याचे मनसेने म्हटले आहे. आपल्या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. त्याचप्रमाणे आयपीएलचा मोठा प्रेक्षक वर्ग हा मराठी असतानाही तुम्हाला मराठीचा विसर पडल्याचे दिसत असल्याचे म्हणत मनसेने कंपनीला खडेबोल सुनावले आहेत.


कंपनीने आयपीएलचा यंदाचा हंगाम संपण्याआधी मराठी भाषेमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी विनंती या पत्रामध्ये मनसेने केली आहे. तसेच कंपनीने वेळेत यासंदर्भात निर्णय घेतला नाही तर मनसेच्या प्रचलित पद्धतीने आंदोलन करावे लागेल व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी, असेही मनसेने पत्राच्या शेवटी म्हटले आहे. आयपीएल.क्रिकेट सामान्यांची कॉमेंट्री मराठीत करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आवश्यक ते सहकार्य करू,पण नुसतीच चालढकल केली तर महाराष्ट्र सैनिकांशी गाठ आहे हे लक्षात असु द्या.., अशी कॅप्शन देत केतन यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केले आहे. तर केतन यांनी अन्य एका ट्विटमध्ये, क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री मराठी भाषेत का नसावी? एकापेक्षा एक असे उत्तम समालोचक महाराष्ट्रात आहेत. गरज असल्यास आम्ही शोधून देऊ, अशी ऑफरही कंपनीला दिली आहे.