दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या मदरशांवर सरकारने बंदी घालावी; भाजपच्या मंत्र्याची मागणी


भोपाळ: कट्टरतावाद आणि द्वेषभाव देशातील मदरशांमधील लहान मुलांमध्ये रुजवला जातो. दहशतवादी याच मदरशांमध्येच तयार होतात, असे वक्तव्य भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी केले आहे. राष्ट्रवादाला सुसंगत असे शिक्षण मदरशांमध्ये दिले जात नसल्यामुळे सरकारने या मदरशांमधील प्रचलित शिक्षण पद्धती मोडून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, अशी मागणी उषा ठाकूर यांनी केली.

मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण सध्या पोटनिवडणुकांच्या निमित्ताने तापले आहे. मंगळवारी इंदौर येथील पत्रकारपरिषदेत शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री असलेल्या उषा ठाकूर बोलत होत्या. उषा ठाकूर यांनी यावेळी आसामच्या धर्तीवर देशातील सर्व मदरसे बंद करण्याची मागणी केली. संविधानाची स्वत:ची अशी वेगळी व्याख्या करणे योग्य नाही. विद्यार्थी हे विद्यार्थी असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची सामूहिक शिक्षण होणे गरजेचे असल्याचे उषा ठाकूर यांनी सांगितले.

मदरशांमधील लहान मुलांमध्ये धर्माधारित शिक्षण कट्टरता आणि द्वेषभाव रुजवते. कोणती संस्कृती मदरशांमध्ये शिकवली जाते? आतापर्यंतची परिस्थिती पाहिल्यास सर्व मदरशांमध्ये कट्टरतावाद आणि दहशतवादी तयार झाल्याचे दिसून येईल. याच मदरशांमुळे जम्मू-काश्मीर दहशतवादाचा कारखाना झाला होता. त्यामुळे राष्ट्रवाद आणि समाजाच्या मुख्य प्रवाहाशी स्वत:ला जोडू न शकणाऱ्या मदरशांचे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात विलिनीकरण करावे. जेणेकरून संपूर्ण समाजाचा विकास होईल, असे मत उषा ठाकूर यांनी मांडले. आसाम सरकारने मदरसे बंद करून दाखवल्यामुळे सरकारने देशभरात राष्ट्रहिताच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बंदच केली पाहिजे, असेही उषा ठाकूर यांनी सांगितले.