शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वेगवान हालचाली


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता वेगवान हालचाली होताना दिसत आहेत. दरम्यान जयंत पाटील यांचे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट करत राष्ट्रवादीमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली असल्यामुळे खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.


मंगळवारी देशवासियांना संबोधून नरेंद्र मोदींनी भाषण केले. जयंत पाटील यांनी त्यांच्या या भाषणावर टीका करणारे ट्विट केले होत. पाटील यांनी म्हटले होते की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील, असे वाटले होते. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला.

एकनाथ खडसे यांचे नाव विरोधी पक्षातील प्रभावी व्यक्ती म्हणून पुढे येते. त्यांनी एक पक्ष वाढविण्यासाठी केलेले कष्ट, मेहनत आणि जिद्द लक्षात घेतल्यानंतर आपली नोंद घेतली जात नाही, असे वाटत असेल आणि त्यातून एका विचाराकडे माणूस जातो. जेथे नोंद घेतली जाते तेथे जावे का, असे वाटत असेल आणि एखाद्या पक्षाविषयी तसे वाटत असेल तर चांगलेच असल्याचे म्हणत खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शरद पवार यांनी हिरवा कंदील दाखविला.

Loading RSS Feed