मुख्यमंत्रीपदावरुन येडियुरप्पांना मिळू शकतो डच्चू; भाजप आमदाराचा मोदींनी बदलाचे संकेत दिल्याचा गौप्यस्फोट


बंगळूरु – कर्नाटकात सत्तांतर करुन मुख्यमंत्री झालेल्या बी.एस. येडियुरप्पा यांचे पद आता धोक्यात आले आहे. येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे जाण्याची शक्यता असून, हा गौप्यस्फोट भाजपच्याच आमदाराने केला आहे. लवकरच कर्नाटकातील मुख्यमंत्री बदलण्यात येणार असून, पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल, असे पंतप्रधान मोदी यांनीही म्हटल्याचा दावा भाजपच्या आमदाराने केल्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे.

हा गौप्यस्फोट भाजप आमदार बसंगौडा पी. यतनाल यांनी पक्षाच्या कार्यक्रमात केल्यामुळे कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कार्यक्रमात बोलताना बसंगौडा म्हणाले, राज्यातील बहुसंख्य वरिष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा यांच्यावर नाराज असल्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येईल. पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सांगितले आहे. आमच्यामुळे येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. १०० आमदार उत्तर कर्नाटकातील जनतेने दिले, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले, असे सांगत बसंगौडा यांनी गौप्यस्फोट केला.


कुमारस्वामी यांचे सरकार कोसळल्यानंतर कर्नाटकचे बी.एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले होते. पण आता येडियुरप्पा यांना पक्षातून विरोध होताना दिसत आहे. हा विरोध जाहीरपणे भाजपच्या आमदारानेच बोलून दाखवला असून, पंतप्रधान मोदींचा हवाला दिल्याने कर्नाटकातील सत्तानाट्य पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर पक्षातंर्गत विरोध शमवण्यात येडियुरप्पा यशस्वी ठरणार का? याकडेही राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.