ठाकरे सरकारची रेल्वे बोर्डाला विनंती; महिलांच्या लोकल प्रवासाला परवानगी द्या


मुंबई – राज्य सरकारने पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला महिलांच्या लोकल प्रवासाला परवानगी देण्यासाठी पत्र लिहिले आहे. राज्य सरकारने नवरात्राच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी सरसकट सगळ्या महिलांना लोकल प्रवासाला संमती दिल्याचे म्हटले होते. पण यासंदर्भातील संमती रेल्वे बोर्डाने नाकारली. मुंबई आणि उपनगरांमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या लोकल प्रवासाचा पेच सुटला, असे वाटत असतानाच तो पेच जैसे थेच राहिला. अशात आता पुन्हा एकदा रेल्वे बोर्डाला विनंती करणारे पत्र राज्य सरकारने पाठवले आहे. पण रेल्वे बोर्डाने याबबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

महिलांना लोकल प्रवास करु द्यावा, असे या पत्रात पुन्हा एकदा राज्य सरकारने म्हटले आहे. सध्याच्या घडीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. ठाकरे सरकारने शुक्रवारी संध्याकाळी सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबरपासून म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मुभा दिली होती. पण यासंदर्भातील संमती रेल्वे बोर्डाने नाकारल्यामुळे महिलांना सरसकट लोकलचा प्रवास करता आलाच नाही.

यावरुन भाजपवर काँग्रेसने आरोप केले आहेत. भाजपला महिलांसाठी रेल्वे सुरु करावीशी वाटत नाही. त्यांना यामागे राजकारण करायचे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. तसेच मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद करणारे भाजप नेते हे आता महिलांसाठी लोकल सुरु व्हावी म्हणून घंटानाद का करत नाहीत असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला होता. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सरसकट सर्व महिलांसाठी लोकल सुरु करा, असे पत्र राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला लिहिले आहे.