राज्य सरकारने टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी – फडणवीस


पुणे : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. राज्याला केंद्र सरकार सहाय्य करेलच. पण तत्पूर्वी टोलवाटोलवी न करता आधी राज्य सरकारने मदतीची घोषणा करावी, असे म्हटले आहे. राज्य सरकारने केंद्राची वाट न पाहता मदत द्यावी आणि याबाबत कोणतीही सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळच केंद्रावर ढकलायचे असेल, तर मग राज्य सरकार काय कामाचे आहे, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केले.

याबाबत कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची असल्यामुळे राज्याने तातडीने मदत करावी. केंद्राच्या मदतीची वाट राज्य सरकारने बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी सांगावे, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान भाजप नेत्यांकडून वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नसल्याची टीका केली जात आहे. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. बाकीचे नेते, मंत्री प्रत्यक्ष फिल्डवर जातील. परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, अशी कार्यपद्धती आम्ही ठरवली असल्याचे पवार यांनी आज सांगितले. त्यावर फडणवीसांनी सरकार अपयशी ठरत असल्याने पवारांना बचाव करावा लागत असल्याचे प्रत्युत्तर दिले.

सरकारला शरद पवारांना पाठिशी घालावे लागत आहे आणि सध्याच्या घडीला शरद पवारांकडे या सरकारला पाठिशी घालणे एवढचे काम आहे. लोकांमध्ये राज्य सरकारविरोधात असंतोष आहे. आमचा दौरा घोषित होईपर्यंत कोणताही पालकमंत्री जिल्ह्याकडे फिरकला नव्हता. आम्ही दौरा करायला लागल्यामुळे सगळेजण आता घराबाहेर पडल्याचे फडणवीस म्हणाले.

राज्यातील मंदिरे खुली करण्यावरून मुख्यमंत्र्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी लिहिलेले खरमरीत पत्र आणि त्यावरून शरद पवारांनी राज्यपालांवर केलेली टीका यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. राज्यपालांचे एखादे वाक्य आणि त्यावरून वाद होण्याची ही काही पहिली वेळ नाही. राज्यपालांसोबत मतभेद असतील. ते यापुढे होतील. पण आता शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणे गरजेचे असल्याचे फडणवीस पुढे म्हणाले.