‘बधाई हो’च्या सिक्वेलमध्ये आयुषमानऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी


२०१८ मध्ये अभिनेता आयुषमान खुरानाच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटाने हटके कथा, आयुषमानचा अभिनय एकंदरीत अनेकांची मने जिंकली होती. या चित्रपटाचा पुढचा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण अभिनेता आयुषमान खुराना ऐवजी या चित्रपटात दुसऱ्या एका अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याने ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सीक्वेलची घोषणा केली आहे. ‘बधाई दो’ असे या सीक्वेलचे नाव आहे. तसेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमि पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर भूमिसोबतचा फोटो नुकताच राजकुमार रावने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने, आता तारीख ठरली. २०२१ची सुरुवात शुभेच्छा, असे त्याने म्हटले आहे. तसेच पुढे त्याने हॅशटॅग वापरुन ‘बधाई दो’ असे म्हटले आहे.राजकुमार राव ‘बधाई दो’ या चित्रपटात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भूमि पीटी शिकवणाऱ्या शिक्षिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करणार आहेत. यापूर्वी त्यांनी २०१५मध्ये प्रदर्शित झालेल्या हंटर चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.