मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – चंद्रकांत पाटील


पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले की, यशोमती ठाकूर यांनी न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण त्या अद्यापही आपल्या मंत्रिपदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असे म्हणत यशोमती ठाकूर यांच्यावर चंद्रकांत पाटलांनी निशाणा साधला.

स्वतःहून यशोमती ठाकूर राजीनामा देत नसतील तर त्यांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पण, याविषयी मुख्यमंत्री काहीच भूमिका घेत नाहीत. उद्धव ठाकरे आपले मुख्यमंत्री पद टिकविण्यासाठी काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या हितासाठी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, असे म्हणत यावेळी यशोमती ठाकूर यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

पुढे पाटील असेही म्हणाले की, आपल्याला वरिष्ठ न्यायालयात न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही न्यायालयाकडून त्यांनी पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे त्यांनी या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील व त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.