शेतात फ्लेक्स लावत शेतकऱ्याने काढले फडणवीस, ठाकरे सरकारच्या ‘कर्जमाफी’चे वाभाडे


बुलढाणा – जगाचा पोशिंदा अर्थात शेतकरी आस्मानी संकटामुळे कायमच अडचणीत येत असतो. सरकार नेहमीच या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची लोकप्रिय घोषणा करत असतात. पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात त्याचा किती फायदा होतो हा प्रश्न कायमच सर्वांच्या मनात उद्भवत असतो. यापूर्वीच्या फडणवीस आणि आत्ताच्या ठाकरे सरकारचे अशाच एका कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्याने उद्विग्न होऊन वाभाडे काढले आहेत.

ही व्यथा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भिलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी निलकंठ लिपते यांची असून २०११ मध्ये दीड लाख रुपयांचे दोन एकर शेती असलेल्या लिपते यांनी पीककर्ज घेतले होते. मागच्या फडणवीस सरकारच्या काळात या कर्जमाफीसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांनी सध्याच्या ठाकरे सरकारच्या काळातही पीक कर्जमाफीसाठी अर्ज केला. पण त्यांना या दोन्ही वेळेस कर्जमाफी मिळाली नाही.

सरकार दरबाराच्या वारंवार पायऱ्या चढूनही शासकीय योजनांचा फायदा मिळत नसल्याने वैतागलेल्या लिपते यांनी आपल्या शेतातच मोठा फ्लेक्स लावत त्यावर ‘फसवी कर्जमाफी’ या मथळ्याखाली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो छापत त्यामध्ये या दोन्ही सरकारच्या कालावधीत माझी कर्जमाफी झालीच नाही, त्यामुळे मी एक त्रस्त शेतकरी’ असा संदेश लिहिला. त्यांनी त्याखाली आपले नाव, संपर्क क्रमांक आणि संपूर्ण पत्ताही लिहिला. गावात आणि माध्यमांनी या अनोख्या पद्धतीच्या आंदोलनामुळे दखल घेतल्यानंतर आता सर्वत्र या शेतकऱ्याच्या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.