जावेद मियाँदाद यांनी सांगितले धोनीच्या खराब कामगिरीचे कारण


नवी दिल्ली – चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी आयपीएलचा तेरावा हंगाम आतापर्यंत फारसा चांगला गेलेला नाही. दिल्लीने शारजाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईवर ५ गडी राखून मात केली. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ यंदा साखळी फेरीतून गारद होण्याच्या वाटेवर आहे. स्पर्धेतून सर्वात आधी सुरेश रैना आणि हरभजन यांनी घेतलेली माघार घेतल्यानंतर खेळाडूंच्या दुखापती, महत्वाच्या खेळाडूंचे फॉर्मात नसणे आणि क्षेत्ररक्षणातील खराब कामगिरी यामुळे यंदाच्या हंगामात चेन्नईचा संघ आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. दरम्यान धोनीच्या खराब कामगिरीचे पाकिस्तानेच माजी फलंदाज जावेद मियाँदाद यांनी कारण सांगितले आहे.

आयपीएलमध्ये धोनीला फलंदाजी करताना मी पाहिले आहे. त्याचे फटके खेळताना टायमिंग आणि शरीराची हालचाल हा माझ्यासाठी कळीचा मुद्दा आहे. ज्यावेळी खेळाडू हा पूर्णपणे फिट नसतो त्यावेळी असे होते. त्याच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही, टायमिंग चुकते. त्यामुळे आता धोनीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुम्ही जोपर्यंत खेळत आहात तोपर्यंत आत्मपरीक्षण करत राहणे हे खेळाडूसाठी आवश्यक असते. क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे. जसजसे तुमचे वय वाढत जाते, तसे शरीर हे साथ देत नाही. पहिल्यासारखे फटके बसत नसल्यामुळे खेळाडूंना आपला फिटनेस कायम राखण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते, असे मियाँदाद यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.

मैदानात धावा काढताना धोनी धापा टाकत असलेला फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीचे असे रुप पाहताना त्याच्या चाहत्यांसह सर्वांचे मन हळहळले. धोनी दिल्लीविरुद्ध सामन्यातही स्वस्तात बाद झाला. धोनी जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर आयपीएलमध्ये खेळत आहे. तो मध्यंतरीचा काळ क्रिकेटपासून दूर होता. अशा परिस्थितीत पुनरागमन करणे सोपे नसते. पुन्हा एकदा आपल्या फिटनेसवर त्याला काम करावे लागेल. काही फटके खेळताना त्याच्या शरीराची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही. म्हणूनच तो यंदा खेळताना चाचपडताना दिसतो असल्याचे मत मियाँदाद यांनी मांडले.