मुख्यमंत्र्यांना ‘मनसे’ सल्ला; घराबाहेर पडा अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल


मुंबई : प. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात परतीचा पाऊस आणि वादळी अतिवृष्टीमुळे दाणादाण उडाली. अनेक नद्यांना बुधवारी झालेल्या ढगफुटीने पूर आला. पुणे जिल्ह्यातील चौघे पुरात वाहून गेल्याने मरण पावले. १४ जणांचा बळी सोलापुरात गेला. लोकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्याचे चित्र असून अनेक भागांत पाण्याखाली शेतीही गेली आहे. शेतकऱ्यांच्या आक्रोशाचे आणि वेदनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी असाच एक व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला असून बळीराजावर आता बास रे वरुणराजा… अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शेतात कापणीला आलेली उभी पीके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा व त्यातून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे.


प्राथमिक अंदाजानुसार काढणीवर आलेल्या २३ जिल्ह्यांमधील साडेचार लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. तूर, भात यांच्यासह कापसाचेही नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरफ) तुकड्या उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर व बारामती या ४ ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. तातडीच्या मदतीसाठी वायूसेना, नौदल, लष्कर यांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनुष्यहानी टाळण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिले असले तरी, मुख्यमंत्र्यांनी आता घराबाहेर पडण्याची गरज असल्याचे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे. आपल्या फेसबुक व ट्विटर अकाऊंटवरुन बाळा नांदगावकर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश त्यामध्ये, पाहायला मिळत आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांची परतीच्या पावसाने वाट लावली असून शेतात मातीऐवजी पाणीच पाणी दिसत आहे. या शेतकऱ्याचा आक्रोश पाहून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.


‘मुख्यमंत्रीजी, घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल “online” बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा “ठाकरे”नावावरील विश्वास उडेल, अशी फेसबुक पोस्ट करत बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.