मराठा समाजाच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा सरकारचा निर्णय


मुंबई: राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. सारथीची स्वायत्तता गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काढून घेण्यात आली होती. मराठी समाजातून त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्यावर मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा देखील इशारा दिला होता. यानंतर ठाकरे सरकारने आता ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला असून मराठा समाजाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक ‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर आल्याने मर्यादा आल्या होत्या. त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यासह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्याचा आरोप केला होता.

वर्षभर सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता पुन्हा एकदा ‘सारथी’ला स्वायता बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी बंद होणार नाही, असे सांगताना आठ कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली होती. सारथी संस्थेला १ हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.

सारथी संस्था मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सुरू करण्यात आली होती. पण ही संस्था मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन अधिक चर्चेत आली. यावरून राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद चिघळला होता. आपण ओबीसी असल्याने मला टार्गेट करण्यात येत असल्याचे त्यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटले होते.