व्हिडीओ व्हायरल; हत्तीवर बसून योगा करताना पडले रामदेव बाबा


मथुरा : योगगुरु रामदेव बाबा यांना हत्तीवर बसून योग करणे भलतेच भारी पडले आहे. कारण रामदेव बाबा हत्तीवर बसून योगा करताना खाली कोसळले. हत्तीवर बसून रामदेव प्राणायाम करत होते. परंतु हत्तीने हालचाल केल्याने त्यांचा तोल गेला आणि ते हत्तीवरुन खाली पडले. त्यांना या घटनेत कोणतीही दुखापत झालेली नाही, पण एका क्षणासाठी तिथे उपस्थित लोक घाबरुन गेले.

मथुरेतील महावन रमणरेतीमध्ये असलेल्या कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमात बाबा रामदेव यांनी योग शिबीर आयोजित केले होते. यावेळी आश्रमातील संतांना रामदेव बाबांनी योग शिकवला. मंचावर असलेल्या गुरु शरणानंद महाराज यांनीही योगासने केली होती. रामदेव बाबा यावेळी हत्तीवर बसून योग करत होते. पण हत्तीने हालचाल करताच रामदेव बाबांचा तोल गेला आणि ते हत्तीच्या पाठीवरुन घसरले.


रमणरेती आश्रमात वाळू असल्यामुळे त्यांना पडल्यानंतर कोणतीही दुखापत झाली नाही. ते त्वरित उभे राहून हसू लागले. पण तिथे उपस्थित सर्व संत-महंत आणि भाविकांच्या काळजाचा ठोका रामदेव बाबा हत्तीवरुन खाली पडल्याने चुकला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोमवारचा असल्याचे सांगितले जात आहे.