मुकेश अंबानी यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची मुले घेतात अमेरिकेत शिक्षण


भारतीय उद्योजक मुकेश अंबानी जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत टॉप ५ मध्ये असून ते जगातील सर्वांत महाग घरात राहतात. आलिशान राहणीमानासाठी लागणारी सर्व साधने मुंबईतील एंटिलिया या त्यांच्या निवासस्थानी उपलब्ध असल्यामुळे अंबानी कुटुंबियांचे लाइफस्टाइल हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पण तुम्हाला मुकेश अंबानी यांच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो? हे माहित आहे का? नाही ना… त्याचीच माहिती आज माझा पेपर आपल्या वाचकांना देत आहोत.

जवळपास ६०० नोकर एंटिलिया या निवासस्थानी काम करतात. पण आपल्याकडे कामाला असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला मुकेश व नीता अंबानी हे कुटुंबीयांप्रमाणेच वागणूक देतात असे सांगितले जाते. पण आता विशेष बाब म्हणजे मुकेश अंबानी यांच्याकडे काम करणाऱ्या एका नोकराची दोन मुले चक्क अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. यासंदर्भात ‘लाइव्ह मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार मुकेश अंबानी यांच्या एंटिलिया या निवासस्थानी काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला दोन लाख रुपयांपेक्षा कमी पगार नाही. म्हणजेच अंबानी यांच्या स्वयंपाकीलाही दर महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो. मुकेश अंबानी यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात शिक्षण भत्ता आणि जीवन विमा यांचासुद्धा समावेश आहे.

मुकेश अंबानी हे साधे जेवण पसंत करतात. त्यानुसारच स्वयंपाकी जेवण बनवतो. मुकेश अंबानी यांना पारंपरिक गुजराती पदार्थांसोबतच दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमधील अविभाज्य भाग असलेला खाद्यपदार्थ म्हणजेच इडली व सांबार खूप आवडते. पण यात विशेष बाब अशी की जगातील सर्वांत श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांनासुद्धा स्वयंपाक करता येतो. त्यांच्या घरी सर्वांत चांगले जेवण मुलगी बनवत असल्याचे नीता अंबानी यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.