ट्रम्प यांच्या त्या भारतीय चाहत्याचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन


नवी दिल्ली – भारतातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चाहता अशी ओळख निर्माण झालेल्या बुसा कृष्णा याचे कार्डिअ‍ॅक अरेस्टने निधन झाले आहे. ट्रम्प यांची मागील अनेक वर्षांपासून अगदी देवाप्रमाणे पुजा करणारा कृष्णा हा ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यापासून निराश होता, त्यातच त्याची प्राणज्योत रविवारी मालवली.

इंडियन एक्सप्रेसला कृष्णाचा भाऊ बी विवेक याने दिलेल्या माहितीनुसार कृष्णाने रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे आंघोळ करुन चहा घेतला आणि तो घराच्या बाहेर जात असतानाच जमिनीवर कोसळला. कोरोनाचा संसर्ग ट्रम्प यांना झाल्याचे समजल्यानंतर तो निराश झाला होता. मागील काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. तो घरामध्येच कोसळल्यानंतर आम्ही त्याला रुग्णालयात घेऊन गेलो तिथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याचे विवेक म्हणाला.

मागील काही दिवसांपासून कृष्णा स्वत:च्या फेसबुक पेजवर अनेक व्हिडीओ पोस्ट करत होता. ट्रम्प यांच्या कुटुंबियांना लवकर बरे वाटावे अशी इच्छा व्यक्त करताना, तो अनेकदा या व्हिडीओमध्ये रडताना दिसायचा. आपल्या स्वप्नात ट्रम्प आले होते आणि त्या दिवसापासून आपण त्यांचे भक्त झाल्याचे कृष्णाने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते.

ट्रम्प यांच्या फोटोची पुजा करतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे तेलंगणामध्ये शेती असणारा कृष्णा हा पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी प्रकाश झोतात आला होता. तेव्हापासून तो ‘ट्रम्प यांचा भक्त’ म्हणून स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाला होता. कृष्णाने ट्रम्प यांचा वाढदिवस अगदी हौसेने साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशीच त्याचे ट्रम्प यांचा सहा फुटांचा पुतळा उभारला केला. त्याने या पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून त्याची पुजाही केली होती.