…तर मी देखील भाजपमध्ये प्रवेश करेन – कन्हैया कुमार


नवी दिल्ली – अवघे काही दिवस बिहार विधानसभा निवडणुकीला उरलेले असतानाच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार प्रचारसाठी आता मैदानात उतरले आहेत. आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून कन्हैया कुमार यांनी आपल्या निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. कन्हैया कुमार यांचा या दरम्यानच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यांनी यामध्ये भाजपवर जोरदार निशाणा साधत मला सतत देशद्रोही म्हणत असाल तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.

सोमवारी बगूसराय जिल्हयातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचा उमेदवारी अर्ज भरताना कन्हैया कुमार हे उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत कन्हैया कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पूर्वी ईव्हीएम हॅक होत होते, आता तर भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत असल्याचे कन्हैया कुमार यांनी म्हटले आहे.

जेव्हा काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे होते, तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपचे झाले. एके ठिकाणी मी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल… तर मी बोलेन की खबरदार… जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करेन. हे शिव्या ज्यांना देतात ते 5 मिनिटानंतर काका म्हणायला सुरुवात करतात, असे कन्हैया कुमार यांनी म्हटले. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

बिहारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार हे स्टार प्रचारक आहेत. कन्हैया कुमार हे बेगूसरायेचच रहिवासी असून ते यासोबतच सीपीआयच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्य देखील आहेत. बेगूसराय लोकसभा मतदारसंघातून कन्हैया कुमार यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा भाजपच्या गिरिराज सिंह यांनी पराभव केला होता.