राजपुत्र अमित ठाकरेंचे आमदार रोहित पवारांकडून कौतुक


मुंबई – मनसे नेते आणि राजपुत्र अमित ठाकरेंचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कौतुक केले असून आपल्यासारखे सरकारच्या चांगल्या कामाला दिलसे पाठिंबा देणारे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारने आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला असून मनसेने सरकारच्या या निर्णयास पाठिंबा दर्शवला आहे.

राज्यातील विरोधीपक्ष असलेल्या भाजपने आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयास कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प दुसरीकडे हलविणे किती नुकसानीचे आहे, हे आकडेवारीसहित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पण मनसेने सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला असून राष्ट्रवादीने त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. आरेमधून मेट्रो कारशेड हटविल्यामुळे आर्थिक नुकसान होईल असे आरोप होत आहेत? त्यावर अमित ठाकरेंना काय वाटते, असे विचारले असता या प्रश्नाला अमित ठाकरेंनी उत्तर दिले आहे.


मुंबई आणि भावी पिढीसाठी गरजेचे असलेल्या पर्यावरणाचे नुकसान होण्यापेक्षा कारशेडचे नुकसान झालेले परवडेल, असे अमित ठाकरेंनी म्हटले आहे. यासंदर्भातील माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन देण्यात आली आहे. तसेच, या ट्विटवरुन अमित ठाकरे हेही पर्यावरणप्रेमी असल्याचे सांगण्यात आले आहे. रोहित पवार यांनी मनसेच्या या ट्विटचे आणि अमित ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.

आमच्या वास्तव भूमिकेवरही मोठे होण्यासाठी बोलत असल्याची टिका करणारे आणि सरकारला केवळ विरोधासाठी विरोध करणारे नेते विरोधी पक्षात भरपूर आहेत, पण सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.