‘अटल बोगद्या’जवळचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या नावाचा फलक गायब, काँग्रेस आक्रमक


नवी दिल्ली – रोहतांग पास येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ऑक्टोबर रोजी ‘अटल बोगदा’ राष्ट्राला समर्पित केला. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नावाचा या ठिकाणी एक फलक होता. पण हा फलक आता येथून गायब झाल्यामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये आंदोलन पुकारण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याहस्ते काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या राजवटीत २०१० साली या ‘अटल बोगद्या’च्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. सोनिया गांधी यांचे नाव असलेला हा फलक तीन ऑक्टोबरच्या उद्घाटन कार्यक्रमाआधी हटवण्यात आल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुलदीप सिंह राठोड यांनी केला आहे.

याबद्दल सरकार आणि जिल्हा प्रशासनाचा राठोड यांनी निषेध केला आहे. सरकारने पायाभरणी कार्यक्रमाच्यावेळचा फलक पुन्हा १५ दिवसात बसवला नाही, तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा राठोड यांनी दिला आहे. सोनिया गांधी यांनी २८ जून २०१० रोजी काँग्रेस नेते विरभद्र सिंह आणि माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल यांच्या उपस्थितीत अटल बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केल्याचे कुलदीप सिंह राठोड म्हणाले.