
अनेक तरुणांना समुद्राचे आव्हान साद घालत असते. समुद्रात किंवा भारताच्या नौदलात चांगले करीयर करण्यास आसुसलेल्या अशा तरुणांना नौदलात भरती होणे सोपे जाते. यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणाची गरज असते. असे प्रशिक्षण देण्यासाठी १९९८ साली नॅवल मॅराटाईम अकॅडमी ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न नॅवल कमांड म्हणजे पश्चिम विभागातर्फे हा निमशासकीय विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याचे स्वरूप खाजगी पण कल्याणकारी संस्था असे आहे. पण तिला अधिकृतता आहे. भारतीय नौदलात भरती केल्या जाणार्या नाविकांना ज्या दर्जाचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच दर्जाचे प्रशिक्षण या अकॅडमीत दिले जाते. या संस्थेतले प्रशिक्षण भारतीय नौदल, तटरक्षक दल, इंडियन कस्टम्स्, डायरेक्टर जनरल ऑफ हायट्रोकार्बन्स, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ याशिवाय इतर काही प्रतिष्ठित कंपन्यांनी प्रायोजित केलेले असते. यातल्या काही संस्था, संघटना आणि यंत्रणांतल्या कर्मचार्यांनाही प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या अकॅडमीवर टाकली जाते. त्यामुळे नौदलात किंवा सागरी वाहतूक करणार्या कंपन्यांत नोकरी करू इच्छिणार्यांना या अकॅडमीतले प्रशिक्षण उपयुक्त ठरते.
