बिहार विधानसभा निवडणूक या चिन्हावर लढणार शिवसेना


पाटणा : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले होते. शिवसेनेने त्यावर तीव्र नापसंती व्यक्त करत चिन्ह बदलून द्यावे अशी मागणी केली होती. अखेर शिवसेनेची मागणी मान्य करत निवडणूक आयोगाने शिवसेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे.

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे बिस्कीट हे चिन्ह निवडणूक आयोगाने बदलून द्यावे, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर शिवसेनेने निवडणूक आयोगाला ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एक चिन्ह देण्यात यावे, असे सुचवले होते. पण ही तीनही चिन्ह आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्किटाऐवजी तुतारी वाजवणारा मावळा हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे काल कळवले. शिवसेनेची देखील निवडणूक आयोगाने बदलून दिलेल्या या नव्या चिन्हाला पसंती मिळाली आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर नितीश कुमार यांच्या जदयूने आक्षेप घेतला होता. जदयूचे निवडणूक चिन्ह बाण आहे. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चाची निशाणी धनुष्यबाण असल्याने मतदारांचा गोंधळ होतो, असा जदयूच्या आक्षेपचा मुद्दा होता. जदयूचा आक्षेप ग्राह्य मानत निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही, असे कळवले होते. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेनेला निवडणुकीसाठी धनुष्यबाणाऐवजी दुसरे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सेनेला तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे.