संशोधकांचा धक्कादायक दावा; मोबाईल स्क्रिन आणि नोटांवर 28 दिवस टीकू शकतो कोरोना व्हायरस


सिडनी – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरसबाबत दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर अनेक संशोधकांनी या व्हायरसबाबत संशोधकांनी अनेक मोठे खुलासे देखील केले आहेत. त्यातच आता ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजन्सीच्या संशोधनात नोट, मोबाईल स्क्रीनवर कोरोना व्हायरस 28 दिवस जिवंत राहू शकतो, असा दावा करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाची चाचणी संशोधकांनी तीन वेगवेगळ्या तापमानात अंधारात केली. ज्यामुळे असे सिद्ध झाले आहे की जास्त गरम तापमान झाल्यास कोरोना व्हायरसचे अस्तित्व कमी होते.

संशोधना दरम्यान शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, 20 डिग्री सेल्सियस (68 डिग्री फॉरेनहाइट) तापमानात मोबाईल स्क्रीनवरील गुळगुळीत पृष्ठभागावर कोरोना व्हायरस अधिक सक्षम झाला. त्याचबरोबर काच, स्टील, प्लास्टिक, नोटांवर कोरोना व्हायरस 28 दिवस जगू शकतो, असा दावा त्यांनी केला. त्याचबरोबर 30 डिग्री सेल्सियस (86 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत जगण्याचा त्यांचा वेळ कमी होऊन सात दिवसांवर आला आहे. 40 डिग्री सेल्सियस (104 डिग्री फॉरेनहाईट) पर्यंत असताना, कोरोना व्हायरस केवळ 24 तास जगू शकेल.

त्याचबरोबर संशोधकांचे असे देखील म्हणणे आहे की, छिद्रांच्या पृष्ठभागावर जसे की कापसावर सर्वात कमी तापमानात कोरोना व्हायरस 14 दिवस जिवंत राहू शकतो. उच्चतम तापमानात 16 तासांपर्यंत व्हायरसचे टीकणे शक्य आहे. याबाबत माहिती देताना ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रिपेयरडनेसचे संचालक ट्रेवर ड्रीव्ह यांनी सांगितले की, चाचणी होण्यापूर्वी या संशोधनात वेगवेगळ्या सामग्रीवर व्हायरसचे नमुने काढण्यात आले होते. या दरम्यान अतिसंवेदनशील प्रणालीचा वापर करुन त्यात आढळले की जिवंत व्हायरसचा अंश संक्रमित होण्यास सक्षम आहेत.

ट्रेव्हर ड्रीव्हच्या यांच्या मते, या साहित्यांविषयी जर एखादी व्यक्ती निष्काळजी असेल आणि त्यास स्पर्श करुन तोंडाला, डोळ्यांना किंवा नाकात स्पर्श करत असेल तर त्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पृष्ठभागावरुन जास्त प्रमाणात होतो. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग खोकला, शिंका येणे किंवा बोलण्यामुळे थुंकीच्या बारीक कणांद्वारे होतो.