अशा प्रकारे मिळवू शकता स्मार्टकार्डसारखे दिसणारे आधार कार्ड


मुंबई : केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांसाठी आधार कार्ड हे किती महत्वाचे दस्तावेज झाले आहे हे तुम्हाला काही नव्याने सांगायची गरज नाही. पण आता तेच लॅमिनेशनमध्ये असलेले आधार कार्ड आता तुम्हाला एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. जसे की ते आधार कार्ड तुम्हाला एखाद्या स्मार्टकार्ड सारखे दिसणार आहे. याबाबतची माहिती आधार निर्मिती संस्था UIDAI ने ट्विट करुन दिली आहे. आता आधार कार्डला PVC कार्डवर रिप्रिंट केले जाऊ शकते. हे कार्ड आपल्या एटीएम अथवा डेबिट कार्ड सारखेच असणार आहे, जे आपल्या पाकिटात सहज मावू शकेल. याबाबत माहिती देताना यूआईडीएआईकडून एक ट्विट करत असे सांगण्यात आले आहे की, आता आपले आधार सुविधपूर्ण साईजमध्ये असेल, ज्याला आपण सहज आपल्या पाकिटात ठेवू शकाल.

नवीन आधार कार्ड हे पूर्णपणे वॉटरप्रूफ पीव्हीसी कार्ड असे असणार आहे. तसेच चांगले प्रिंट आणि लॅमिनेटेड असणार आहे. हे दिसायला एटीएम किंवा स्मार्टकार्ड सारखेच असणार आहे. आपले आधार पीव्हीसी आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकता. प्लास्टिक रुपात असलेले हे नवं आधार कार्ड टिकाऊ देखील आहे. तसेच दिसायला आकर्षक आणि यात लेटेस्ट सेक्युरिटी फीचर्स आहेत. सेक्युरिटी फीचर्स मध्ये होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट असणार आहे. या कार्डसाठी आपल्याला मात्र 50 रुपयांचा खर्च येणार आहे.

नवे पीव्हीसी कार्ड आधार मिळविण्यासाठी

  • नव्या आधार पीव्हीसी कार्डसाठी तुम्हाला यूआयडीएआय वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर त्याठिकाणी ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर आपला आधारचा 12 डिजिट नंबर किंवा 16 डिजिटचा व्हर्चुअल आयडी अथवा 28 डिजिटचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) टाकून सेक्युरिटी कोड अथवा कॅप्चा भरावा लागेल.
  • यानंतर ओटीपीसाठी Send OTP ऑप्शनवर क्लिक करा.
  • आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट करा.
  • नंतर आपल्याला आपल्या आधार पीव्हीसी कार्डचा प्रीव्ह्यू येईल. त्यांनंतर आपण खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला 50 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. पेमेंट पूर्ण केल्यानंतर आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.