पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित


मुंबई – मुंबईतील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला असून एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन बेस्टने दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटले आहे. या ग्रीड फेल्युअरचा मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला फटका बसला आहे.

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाल्याचे वृत्त आहे. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला आहे. सध्या हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. पण यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. या तांत्रिक बिघाडाचा रायगड जिल्ह्यालाही फटका बसला असून तिथेही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन अदानी समुहानेही दिली आहे. ३८५ मेगा व्हॅट वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे अदानी समुहाने ट्विटरवरुन म्हटले आहे. या ग्रीड फेल्युअरचा फटका मुंबईतील उपनगरीय वाहतूक सेवेलाही बसला आहे. यासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्त्यांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. मुंबईतील जुहू, अंधेरी, मिरारोड, नवी मुंबई, ठाणे आणि पनवेलमधील अनेक टिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ट्विटरवरही अनेकांनी आपल्या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती दिली आहे.