दिवाळीनंतरही कोरोनाचे प्रमाण वाढतच राहिल्यास शाळा सुरु करणे अशक्य – बच्चू कडू


मुंबई – राज्यातील शाळा-महाविद्यालय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद असून शिक्षण विभागाकडून दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचे संकेत देण्यात आले होते. पण कोरोनाचे प्रमाण दिवाळीनंतरही वाढतच राहिल्यास राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सुरू करणे अशक्‍यच असेल माहिती शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये, अशी मागणी आता होऊ लागली आहे. राज्य सरकारने दिवाळीनंतर कोरोनाविषयी जाहीर केलेले नियम पाळून शाळा सुरू करण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता बच्चू कडू यांनी वरील अंदाज व्यक्त केला आहे.

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये आणि आता दिवाळीनंतर शाळा सुरू करता येईल का, याचा विचार आपण करत होतो. दिवाळीनंतर जर कोरोनाची दुसरी लाट आली आणि संक्रमण वाढले, तर दिवाळीनंतरही शाळा आपल्याला बंदच ठेवाव्या लागणार आहेत. कदाचित आतापेक्षा कोरोनाचे संक्रमण कमी झाले आणि आपल्याला वाटले शाळा सुरू करायला हरकत नाही, तेव्हा शाळा सुरू करता येतील. पण जगाचा विचार आपण केला तर ब्रिटनमधील 13 हजार विद्यार्थी कोरोनाबाधित झाले असल्याचेही कडू यावेळी म्हणाले.